जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 17:07 IST2023-06-17T17:07:26+5:302023-06-17T17:07:38+5:30
भुसावळनजीकच अकलूद येथील या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची वर्गांमध्ये नियमित तपासणी होत होती. त्यावेळी नववीच्या एका विद्यार्थ्यांच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आले.

जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल
वासुदेव सरोदे
फैजपूर (जि. जळगाव) : नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात चक्क गावठी पिस्तूल आढळून आले. शिक्षण क्षेत्रातील ही धक्कादायक घटना अकलूद, ता. यावल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी घडली. विशेष म्हणजे शाळा प्रशासनाच्या नियमित दप्तर तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
भुसावळनजीकच अकलूद येथील या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची वर्गांमध्ये नियमित तपासणी होत होती. त्यावेळी नववीच्या एका विद्यार्थ्यांच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आले. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले. हे गावठी पिस्तूल ५ हजार रुपये किमतीचे आणि नऊ एमएम बोर व ॲल्युमिनिअमचे आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या दप्तरात असलेले गावठी पिस्तूल कोणाचे आहे व त्याने शाळेत कुठल्या उद्देशाने आणले याची चौकशी पोलिस करीत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक आनंद शाह यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. प्रभाकर चौधरी व पोकॉ. उमेश चौधरी तपास करीत आहेत.
शाळेत विद्यार्थ्याच्या दप्तराची नियमित तपासणी होते. यात नववीच्या विद्यार्थ्याकडे हे पिस्तूल आढळून आले. यानंतर आम्ही या मुलाच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घेतले आणि फैजपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
- आनंद शाह, मुख्याध्यापक.