गावात लेक जन्मल्यास ग्रामपंचायत मुलीच्या नावे करणार ५ हजार १०० रुपयांचे 'फिक्स डिपॉझिट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:31 IST2025-06-02T12:30:12+5:302025-06-02T12:31:35+5:30
कन्याजन्माचा हा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच मनीषा गायकवाड यांनी दिली.

गावात लेक जन्मल्यास ग्रामपंचायत मुलीच्या नावे करणार ५ हजार १०० रुपयांचे 'फिक्स डिपॉझिट'
गणेश अहिरे, लोकमत न्यूज नेटवर्क, वडजी (जि. जळगाव: मुलीच्या जन्माचे घटते प्रमाण पाहता वडजी (ता. भडगाव) ग्रामपंचायतीने गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्यारत्नाच्या नावाने ५,१०० रुपये पोस्टात फिक्स डिपॉझिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यारत्नांचा सन्मान करणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून झाली आहे. मुलाप्रमाणेच कन्याही कुटुंबासाठी महत्त्वाचा घटक आहे, असा संदेश यातून ग्रामपंचायतीने दिला. वडजी येथे ३० मे रोजी ग्रामसभा झाली. त्यात गावात १ जून २०२५ पासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येच्या नावाने रक्कम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी दूध सोसायटीचे रणधीर पाटील होते.
कन्याजन्माचा सन्मान
गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट पावती करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्याजन्माचा हा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच मनीषा गायकवाड यांनी दिली.
१८ व्या वर्षी रक्कम
ग्रामपंचायतीकडून कन्येच्या नावे फिक्स डिपॉझिट करण्यात येईल. ही रक्कम कन्येच्या १८ वर्षे वयापर्यंत काढता येणार नाही. पैसे शिक्षण, लग्नासाठी कामात यावेत, हा त्यामागचा हेतू आहे.