भयानक! शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 23:16 IST2026-01-27T23:15:31+5:302026-01-27T23:16:52+5:30
Bhusawal Sakari village incident : जळगाव जिल्ह्यातील साकरी (भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरूने विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना.

भयानक! शिकवणीला जाणाऱ्या २ मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकललं; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भुसावळ (जळगाव): जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर साकरी गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले होते.
साकरी येथील दोन अल्पवयीन मुली आज नेहमीप्रमाणे घराकडून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी गावातीलच रोहन चौधरी नावाच्या एका माथेफिरू तरुणाने या मुलींना वाटेत अडवले. काही समजण्याच्या आतच त्याने या दोन्ही मुलींना जवळच असलेल्या शेतातील विहिरीत ढकलून दिले. मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी साकरी गावात धाव घेतली. जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित आरोपी रोहन चौधरी याला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या माथेफिरूच्या मुसक्या आवळल्या आहेत.
भय आणि संतापाचे वातावरण
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे भुसावळ तालुक्यात पालकांमध्ये भीतीचे तर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.