The honesty of the female carrier of Chalisgaon | चाळीसगावच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा
चाळीसगावच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा

ठळक मुद्देबसमध्ये सापडलेले दागिने केले परत दागिने मालेगाव येथील महिलेचे

चाळीसगाव, जि.जळगाव : बसमध्ये प्रवासी महिलेचे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे सापडलेले दागिने वाहक असणाऱ्या महिलेने परत करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. चाळीसगाव आगारातील वाहक शोभा आगोणे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल बुधवारी त्यांचा जळगाव येथे विभागीय वाहतूक अधिक्षक डी.जी.बंजारा यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
शोभा सुरेश आगोणे या सात वर्षापूर्वी परिवहन मंडळात वाहक पदावर रुजू झाल्या. त्या चाळीसगावला घाटरोड लगतच्या धनगर गल्लीतील रहिवासी आहेत. सुरुवातीला त्या धुळे बस आगारात होत्या. सद्य:स्थितीत चाळीसगाव आगारात कार्यरत आहेत.
८ रोजी त्या चाळीसगाव-मालेगाव बस घेऊन निघाल्या. याच प्रवास फेरीत मालेगाव स्थित एका महिलेची पर्स बसमध्ये राहून गेली. बस पुन्हा चाळीसगावकडे निघाली. त्यानंतर शोभा आगोणे यांचे 'त्या' पर्सकडे लक्ष गेले. परतीच्या प्रवासात बसमध्ये प्रवासी नसल्याने पर्स मालेगावातील प्रवासी महिलेचीच असावी, हे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ही पर्स वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे व चांदीचे दागिने होते. जवळपास २५ हजार रुपये किमतीचा ऐवज असण्याचा अंदाज आहे.
शोभा आगोणे यांनी यापूवीर्ही जळगाव चाळीसगाव फेरीवर बसमध्ये प्रवाशाची महत्वाची सापडलेली कागदपत्रेही पाचोरा आगारात परत केली होती. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून बुधवारी जळगाव येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी डी.जी. बंजारा, कामगार सेनेचे गोपाळ पाटील, अजमल चव्हाण, खुशाल मोरे, अनिल पाटील, नीलेश सपकाळे आदी उपस्थित होते.

Web Title: The honesty of the female carrier of Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.