पक्ष्यांना फरसाण अन् पाव खाऊ घालणार, तो जाळ्यात अडकणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:19 IST2025-03-13T16:18:41+5:302025-03-13T16:19:00+5:30
अनेकांची भूतदया पक्ष्यांसाठी ठरू शकते घातक, अयोग्य खाद्य देणाऱ्याला होऊ शकतो दंड

पक्ष्यांना फरसाण अन् पाव खाऊ घालणार, तो जाळ्यात अडकणार !
जळगाव : हिवाळ्याच्या काळात अनेक परदेशी पक्षी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पक्षी दिसले की अनेकांकडून पक्ष्यांना घरातील खाद्यपदार्थ खायला दिले जातात. प्रेक्षणीय स्थळे, उद्याने; तसेच पाणवठ्यांवर उतरलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांना अप्रमाणित खाद्य जसे पाव, चपाती, फरसाण, भात, शेव असे पदार्थ देणे नियमबाह्य आहे. पक्ष्यांना त्यांच्या शरीररचनेच्या विपरीत खाद्य घालून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यास दंड अथवा शिक्षा होऊ शकते.
मध्यंतरी मुंबईच्या किनाऱ्यावरील सीगल या पक्ष्याला चिप्ससह इतर खाद्य दिल्यावरून पक्षी अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पक्ष्यांना भरवला जाणारा 'जंक फूड'चा खाऊ त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करत पक्ष्यांना अशा प्रकारचा खाऊ घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारे पत्र पक्षीप्रेमींनी शासनाला दिले होते. केवळ याच पक्ष्यांसाठी नव्हे, तर इतर पक्ष्यांसाठीही हे खाद्य घातक ठरू शकते. जळगावातही तलाव, विहिरी आदी ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांना शेव, चिवडा, चिप्स खाऊ घालण्याचे प्रकार घडतात.
पाव, शेव पक्ष्यांसाठी ठरतात हानिकारक
अनेकजण चण्याच्या पिठापासून बनवलेल्या गाठिया, फरसाण, चिवडा, शेव आदी पदार्थ पक्ष्यांना देतात. मात्र, हे पदार्थ पक्षांच्या प्रकृतीसाठी घातक असल्याचा दावा पक्षीप्रेमी करतात.
जिल्ह्यातील पक्षी निरीक्षणाची ठिकाणे
मेहरुण तलाव : जळगाव शहरातील प्रसिद्ध असलेल्या मेहरुण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी दाखल होतात.
हतनूर धरण परिसर : हतनूर धरण परिसरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी दाखल होतात. या जलाशयाला रामसरचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.
सातपुड्यातील जलाशय : सातपुड्यातील उथळ असलेल्या जलाशयांवर देखील पक्षी दाखल होतात. या ठिकाणी निरीक्षणासाठी केवळ जिल्ह्यातीलच नाही, तर जिल्ह्याबाहेरील पक्षी अभ्यासक दाखल होत असतात.
जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचा अधिवास
हिवाळ्याच्या काळात अनेक स्थलांतरित पक्षी हे सैबेरिया, रशिया, तिबेट, युरोपातून हजारो किमीचा प्रवास करून जिल्ह्यातील पाणवठ्यांवर येत असतात.
यंदा जळगाव जिल्ह्यातील जलाशयांवर मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून आले. हिवाळ्यात जिल्ह्यातील जलाशये ही पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरत असतात.