जळगाव : निती आयोगाच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्यभर हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणारा मुख्य सूत्रधार अविनाश उर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला पोलिस पोहचण्यापूर्वी कुणकुण लागत असल्याने तो राज्यातील पोलिसांना सतत चकवा देत होता. जळगाव पोलिसांना दोन वेळा चकवा दिल्यानंतर त्याने तपासाधिकारी संदीप पाटील यांना, ‘तुम्ही अहमदनगरला येऊन गेले, पुण्यात नाकाबंदी लावली, काय उपयोग झाला. उगाचच माझ्या मागे फिरू नका, मी तुम्हाला सापडणार नाही,’ असे आव्हान दिले होते. पोलिसांनी त्याचे हेच आव्हान स्वीकारले अन् त्याच्याच गावातून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमकर याने हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, धुळे, कल्याण, अंबरनाथ व ठाणे आदी ठिकाणी अशीच फसवणूक केली असून कल्याणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती, तेव्हा तीन महिने तो कारागृहात होता. त्याच्यावर राज्यभर अशाच प्रकारचे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नेहमीच वेशांतर करून तो वेगवेगळ्या भागात वावरत असायचा. जळगावच्या गुन्ह्यातील फिर्यादी योगिता मालवी यांना तर त्याने नोटांच्या बंडलसोबतचे फोटाचे पाठविले आहेत. दोन हजार व पाचशे अशा दोन प्रकारच्या नोटांचे बंडल त्यात असून कोट्यवधींची रक्कम त्यात दिसून येत आहे. अर्थात, या नोटा खऱ्या की खोट्या हा देखील चौकशीचा भाग आहे.
११ व ७ कोटीचे दिले धनादेश
कळमकर याच्याकडून कुठलेच केंद्र सुरू झाले नाही, म्हणून सर्व केंद्र चालकांनी पैशासाठी तगादा लावला असता कळमकर व खवले या दोघांचे सह्यांचे ११ कोटी १७ लाख ५२ हजार तर दुसरा ७ कोटी २५ लाख ६८ हजार रुपये असे दोन धनादेश त्याने पाठविले. मात्र, ते बँकेत बाऊन्स झाले. याआधीदेखील त्याने दोन कोटी, चार कोटी २० लाख असे धनादेश दिले होते, तेदेखील बाऊन्स झाले होते.