भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे हातपंप झाले प्रवाहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:10 IST2019-07-21T15:07:29+5:302019-07-21T15:10:13+5:30
महिंदळे येथे व परिसरात पहिल्याच पावसात पाझर तलावाला पाणी आले असून, परिसरातील हातपंपही प्रवाहित झाले आहेत.

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे हातपंप झाले प्रवाहित
भास्कर पाटील
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे व परिसरात पहिल्याच पावसात पाझर तलावाला पाणी आले असून, परिसरातील हातपंपही प्रवाहित झाले आहेत.
महिंदळे परिसरात आजतागायत जोरदार पावसाचे आगमन झाले नव्हते. परंतु या पहिल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मृतावस्थेत गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले. अन्यथा दुबारपेरणीचे संकट समोर उभे दिसायला लागले होते व गुरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच बिकट झाला होता.
पाच कि.मी.पर्यंत गुरांना पाणी पिण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या पावसामुळे मात्र गावाजवळील पाझर तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा आल्यामुळे गुरांची भटकंती थांबली. गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेले हातपंपही प्रवाहीत झाले. यामुळे पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्यासाठी मदत होईल. पण अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. दमदार पाऊस येईल तरच विहिरींना पाणी येईल व उत्पन्नात भर पडेल.