Great opportunity to make India progress in manufacturing: Dr. Devsarkar | भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी- डॉ. देवसरकर
भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी- डॉ. देवसरकर

ठळक मुद्देफॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत भुसावळ येथे पाच दिवसीय कार्यशाळा सुरूऔरंगाबाद, धुळे, शहादा, शिरपूर, नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील ५८ अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांचा सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ.एस.बी. देवसरकर यांनी सांगितले.
भारत सरकारच्या तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठाची विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्राध्यापकांसाठी श्री संत गाडगे बाबा कॉलेज आॅफ इंजिनियरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित केलेल्या पाचव्या एफडीपी (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यशाळेत ते बोलत होते.
भारतीय उत्पादन क्षेत्रात सध्याच्या काळात आमूलाग्र बदलाची गरज आहे, कारण गेल्या तीन दशकात बदलासाठी तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अधोरेखित करतानाच बदलाची ही गती मंदावणार नाही, या क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी चालून आली आहे. फक्त सामान्य माणसाच्या हितासाठी काम केले पाहिजे. तसेच कौशल्य विकासाचे धडे गिरवताना उत्पादनातील छोट्या छोट्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे, असे मार्गदर्शन डॉ.देवसरकर यांनी केले.
देशाच्या विकासाची व्यापक रुपरेषा तयार करण्यासाठी देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मनुष्यबळाचा बुद्धिमानपूर्वक उपयोग परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असेल. भविष्यात जागतिक मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची क्षमता भारताकडे असल्याने उत्पादन क्षेत्रात लक्ष्य केंद्रित कौशल्य विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
७ रोजी सुरू झालेली ही कार्यशाळा ११ रोजी संपणार आहे. प्रसंगी या कार्यक्रमासाठी डीबीएटीयू लोणेरे येथील समन्वयक डॉ.नीरज अग्रवाल, अभ्यास समन्वयक प्रा.एस.यू. वायकर, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, आॅटोडेस्कचे एक्स्पर्ट ऋषिकेश सावंत, डीन प्रा.डॉ.राहुल बारजिभे व विभागप्रमुख उपस्थित होते.
औरंगाबाद, धुळे, शहादा, शिरपूर, नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील ५८ अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला आहे. सूत्रसंचालन प्रा.आय.डी. पॉल यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले.
 


Web Title: Great opportunity to make India progress in manufacturing: Dr. Devsarkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.