गीतांजली एक्सप्रेस मध्ये ‘टि.सी.’कडून दोन वृद्ध महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:07 IST2018-07-30T12:06:50+5:302018-07-30T12:07:35+5:30
जळगाव रेल्वे स्थानकावर गोंधळ

गीतांजली एक्सप्रेस मध्ये ‘टि.सी.’कडून दोन वृद्ध महिलांना मारहाण
जळगाव : आरक्षित तिकीट नसल्याचे कारण सांगून गीतांजली एक्सप्रेसमधील तिकीट तपासणीसने (टि.सी.) फुपनगरी येथील दोन वृद्ध महिलांना मारहाण केल्याची तक्रार या महिलांसह रेल्वे पोलिसांकडे केली असून या बाबत रेल्वे पोलिसात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्या महिलांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, फुपनगरी येथील विमल कशिनाथ सोनवणे (६५) व सुशिलाबाई कांबळे (६५) यांना मुंबई येथे जायचे असल्याने त्या रविवारी दुपारी तीन वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरुन गीतांजली एक्सप्रेसमध्ये चढत होत्या.
त्या वेळी गाडीतील टिसी एम.के. सिंग यांनी या महिलांना धक्का देऊन खाली उतरवून दिले व मारहाण केली, असे महिलांचे व प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या महिलांसह आठ ते दहा प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे सिंग यांच्या विरोधात तक्रार दिली.
त्यानंतर या महिलांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
दोन्ही महिलांसह प्रवाशांकडून तक्रार
या बाबत रेल्वे पोलीस अनिंद्र नगराडे यांनी सांगितले की, आरक्षित बोगीमध्ये आठ ते दहा प्रवासी हे जनरल बोगीचे तिकीट असताना आरक्षित बोगीत चढले होते. त्यांना टीसीने दंड भरण्याच्या सूचना केल्या. त्याचवेळी या दोन महिलादेखील विना आरक्षित बोगीचे तिकीट असताना आरक्षित बोगीत चढत होत्या. त्या वेळी त्यांनाही टीसीने रोखले व त्यांचा हात पकडून खाली उतरवून दिले. त्या दरम्यान प्रवाशांनी टीसीने मारहाण केल्याचा आरोप करीत अगोदर टीसीविरुद्ध तक्रार घेण्याचा आग्रह केला. त्यानुसार सदर महिलांची तक्रार घेऊन टीसी विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या मुळे रेल्वे स्थानकावर काही वेळ गोंधळ झाला होता.