लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत
By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 18:58 IST2020-11-01T18:58:19+5:302020-11-01T18:58:58+5:30
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते.

लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत
जळगाव - राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळाने 12 हजार 528 पदांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. तेव्हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला, त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे 13 टक्के आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले. त्यामुळे, लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध विषयांवर यावेळी भाष्य केले. विधान परिषदेवर बारा जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी लवकरच नवीन कायदा आणला जाईल, तसेच आंध्रप्रदेशाप्रमाणे महिला अत्याचाराविरोधी दिशा कायद्याप्रमाणे नवीन कायदा आणला जाईल, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.