गौरी-गणपती उत्सवात दरवळणाऱ्या सुगंधांचेही मोल वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:56+5:302021-09-13T04:15:56+5:30
जळगाव : गेल्या १० दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे फुले खराब होऊन ऐन गौरी-गणपती उत्सवात आवक घटल्याने फुलांचे भाव चांगलेच ...

गौरी-गणपती उत्सवात दरवळणाऱ्या सुगंधांचेही मोल वधारले
जळगाव : गेल्या १० दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे फुले खराब होऊन ऐन गौरी-गणपती उत्सवात आवक घटल्याने फुलांचे भाव चांगलेच वधारले आहे. झेंडूची फुले ६० ते ८० रुपये, निशिगंधाची फुले ६०० रुपये तर शेवंतीची फुले १५० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कमळाचे एक फूल ५० रुपयांना विक्री होत आहे.
निर्बंधामुळे लग्नसराईत मागणी नसली तरी त्यानंतर श्रावण महिन्यात झेंडूच्या फुलांना मागणी वाढू लागली. त्यामुळे श्रावण महिन्यात झेंडूच्या फुलांचे भाव ५० रुपये प्रति किलोवर पोहोचले. गणेशोत्सवात हे भाव पुन्हा वाढले. गणेश चतुर्थीला तर झेंडूचे फुले १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आता मात्र ते ६० ते ८० रुपयांवर आले आहे. सध्या आवक कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने भाव वाढीस मदत होत असल्याचे फूल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गौरींच्या आगमनाला ‘निशिगंधा’ कडाडले
गणपती पाठोपाठ गौरींचेही आगमन होते. या काळात फुलांना अधिक मागणी वाढते. त्यात या काळात निशिगंधाच्या फुलांना जास्त मागणी असते. गौरींच्या आगमनालाच निशिगंधाच्या फुलांचे भाव वधारून ते ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. आठवडाभरापूर्वी या फुलांचे भाव २०० रुपये प्रति किलोवर होते. आठवडाभरातच हे भाव तीनपटीने वधारले आहे.
कमळाचे फूल ५० रुपये नग
कमळाच्या फुलांचे भाव तर कधी एवढ्या प्रमाणात वाढले आहे. हे एक फूल ५० रुपयांना विक्री होत आहे. तसेच गेल्या आठवड्यात ८० ते १०० रुपये प्रति किलो असलेले शेवंतीचे फूल १५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अष्टरची फुलेदेखील १०० ते १५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
पावसाचा तडाखा
सध्या जळगावात हिंगोली, वालसावंगी या भागातून झेंडूचे फुले येत आहेत. तसेच फुलंब्री येथून शेवंती तर शिरसोली येथून निशिगंधाची फुले येत आहे. मात्र पावसामुळे शेतातच बरीच फुले खराब झाल्याने सर्वच फुलांचे भाव वाढत आहेत.