जळगाव : मुलीचे परस्पर लग्न लावून देण्यासह दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सदर मुलीचे ज्या तरुणाशी लग्न लावून दिले त्या आशिष सदाशिव गंगाधरे (३०) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.हरिविठ्ठलनगरातील मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले व नंतर लग्नासाठी दिलेले पैसे, तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सचिन दादाराव अडकमोल, मनीषा ऊर्फ मीनाक्षी दिनेश जैन (दोन्ही रा. जळगाव), मुलीचा पती आशिष गंगाधरे व त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मुलीसह मध्यस्थांविरुद्ध गुन्हा, एकाला अटकया प्रकरणात आशिष गंगाधरे यानेदेखील तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, सदर मुलगी, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री हे मुलगी दाखविण्यासाठी आले व त्यांना एक लाख ९५ हजार रुपये दिले आणि ३ फेब्रुवारी रोजी लग्न झाले.
परत जाण्याबाबत टाळाटाळ
- सदर मुलगी एप्रिल २०२५मध्ये जळगावात आली व परत जाण्यास टाळाटाळ करू लागली. ती घरी तर परतली नाही व पैसे, दागिनेही परत दिले नाही. मुलीचा मोबाइल बंद असल्याने आशिष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे हे २४ जून रोजी जळगावात आले.
- मुलीच्या आईकडे विचारणा केली. त्यावेळी ज्यांनी लग्न लावून दिले, त्यांना विचारा, असे आईने सांगितले. आशिष गंगाधरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुलगी, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.