"जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत"

By अमित महाबळ | Published: April 30, 2023 05:11 PM2023-04-30T17:11:02+5:302023-04-30T17:13:37+5:30

जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

 Former MLA Dr asserted that the world has nothing to do with your caste and religion. done by Sudhir Tambe  | "जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत"

"जगाला तुमच्या जातीधर्माशी काही देणेघेणे नाही, तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवेत"

googlenewsNext

जळगाव : भारतीय विद्यार्थी मु‌ळातून हुशार असतात. त्यांना देश-विदेशात अनेक क्षेत्रात संधी आहेत. पण आता जगाला तुमची जात, धर्म याच्याशी देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना तुमच्यातील कर्तृत्व, बुद्धिमत्ता, परिश्रम हवे आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. ते रविवारी, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

पतपेढीतर्फे आदर्श शिक्षक व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश पाटील होते, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड होते. आर. एच. बाविस्कर, संभाजी पाटील, साधना लोखंडे, पुष्पा पाटील, संजय खंबायत, पतपेढीचे पदाधिकारी व संचालक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, की जगातील सात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे सीईओ हे भारतीय व्यक्ती आहेत. भारताची लोकसंख्या १४२ कोटी झाली आहे. तिचा कसा चांगला उपयोग करून घेता येईल हे ठरवले पाहिजे. बलशाली भारत होण्यासाठी सरकारला शिक्षण क्षेत्रावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यावरील खर्च वाढवावा लागेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पण राज्यात खासगी आणि जि. प. शाळांमधील विद्यार्थी, असे दोन वर्ग तयार झाले आहेत. त्यांच्यातील तफावत दूर झाली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. तांबे यांनी व्यक्त केली. 

खासदार उन्मेश पाटील यांनी कॉलेजमध्ये पुस्तकी ज्ञान मिळाले मात्र, प्रत्यक्ष अनुभव हा १० महिन्यांच्या नोकरीत मिळाला. आताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती दिली. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मुलाखती घ्याव्यात. त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. आमदार किशोर दराडे यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली. नीळकंठ गायकवाड यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालक व्हावे. त्यांना वेळोवेळी मदत करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात आदर्श शिक्षक डॉ. विलास नारखेडे आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  

पुढील महिन्यापासून अभ्यासिका, निवास व्यवस्था
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस. डी. भिरुड यांनी केले. पुढील महिन्यापासून संस्थेच्या नवीन वास्तूत अभ्यासिका आणि बाहेरगावहून येणाऱ्या संस्थेच्या सभासदांसाठी निवास व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन वैशाली महाजन, शैलेंद्र महाजन यांनी केले. स्वागत गीत राजू व संजय क्षीरसागर यांनी सादर केले. आभार संजय सांगडकर यांनी मानले.


  

Web Title:  Former MLA Dr asserted that the world has nothing to do with your caste and religion. done by Sudhir Tambe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव