वृत्तपत्र विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुकेश गुजराथी यांच्या वारसाला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:20 IST2020-01-10T16:18:35+5:302020-01-10T16:20:45+5:30
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली.

वृत्तपत्र विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुकेश गुजराथी यांच्या वारसाला आर्थिक मदत
पारोळा, जि.जळगाव : येथील स्व.मुकेश मोतीलाल गुजराथी हे गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून अविरतपणे गल्ली-बोळात पानटपरी, चहा हॉटेलवर जाऊन वृत्तपत्र वाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कॅन्सरसारख्या आजाराने ते ग्रस्त झाले. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब खूप खचले होते. त्या आघातातून हे गुजराथी कुटुंब सावरावे यासाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने १० हजार रुपयांची मदत करीत एक सामाजिक बांधीलकी जपली.
मुलाला शिकून मोठे केले. पोटाला चिमटा देत वृत्तपत्र विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलाला एमबीए करीत त्याच्यासाठी कर्ज स्वरूपाने पैसा उपलब्ध केला. मुलाला शिकविण्याची दांडगी इच्छा मुकेश यांची होती. परिस्थिती नसताना गरिबीवर मात करीत वडिलांनी मुलाला उच्च शिक्षित केले. वर्षाचा कालावधी लोटला गेला असता. मुलगा कमावता झाला असता आणि त्यांच्या नशिबी असलेली गरीबीचे ग्रहणदेखील सुटले असते. ते नेहमी सांगत की, मुलगा कमवता झाला की हे सर्व सोडून आरामाचे जीवन जगू. पण त्य आधी नियतीने डाव साधत अर्ध्या संसारात त्यांना बाद करीत जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले.
वडिलांच्या आजारपण आणि निधनाची बातमी मुलगा दीपक यास समजल्यावर तो हैद्राराबाद येथे शिक्षण घेत होता. त्याने स्वत:चा लॅपटॉप विकून हैद्राबाद येथून पारोळा गाठले.
मदतप्रसंगी दर्पण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय नावरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रावसाहेब भोसले, उपाध्यक्ष अभय पाटील, सचिव योगेश पाटील, सदस्य संजय पाटील, विश्वास चौधरी, रमेश जैन, राकेश शिंदे, दिलीप सोनार, अशोक ललवाणी, संजय चौधरी, निंबा मराठे आदी उपस्थित होते.