'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:49 IST2025-12-20T10:48:53+5:302025-12-20T10:49:57+5:30
भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे, मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत.

'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
जळगाव - महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 'निष्ठावंत विरुद्ध आयात' असा नवा संघर्ष उभा ठाकला आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्ये ४९१ इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे तर अजून काही रांगेत आहेत. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
काही महिन्यांपासून उद्धव सेनेसह इतर पक्षांतील बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, सुनील महाजन आणि प्रशांत नाईक या माजी नगरसेवकांच्या आगमनामुळे भाजपाला ताकद मिळाली असली तरी मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे, मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत. तिकीट कन्फर्म अटीवरच हे प्रवेश होणार आहेत, त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंतांना सांभाळणे पक्षाला कठीण जात आहे.
घराणेशाही आणि बंडाळीचे सावट
यावेळच्या निवडणुकीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांच्या नातेवाइकांनी ही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. 'घराणेशाहीला थारा देणार नाही' असा दावा करणाऱ्या पक्षांकडून नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नीला तिकीट मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर घराणेशाहीला प्राधान्य मिळाले, तर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरीच्या किंवा पक्षांतराच्या पवित्र्यात आहेत. आता पक्ष आपली उमेदवारी यादी जाहीर करताना निष्ठावंतांना न्याय देतात की केवळ 'निवडून येण्याची क्षमता' पाहून आयातांना झुकते माप देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
निष्ठावंतांनाच प्राधान्य मिळण्याविषयी दबाव
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस वाढली आहे. वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ज्या जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो, तिथे निष्ठावंतांनाच प्राधान्य मिळावे, असा दबाव नेत्यांवर येत आहे.
आश्वासनांचा पाऊस मात्र समस्यांचा डोंगर कायम
राजकीय साठमारी सुरू असतानाच सर्वसामान्य जळगावकर मात्र आजही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे जनता त्रस्त आहे. ड्रेनेजची अर्धवट कामे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून 'जैसे थे' आहे. निवडणूक जाहीर झाली की आश्वासनांची खैरात होते, मात्र निकालानंतर हे प्रश्न पुन्हा बासनात गुंडाळले जातात, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.