जामनेरला शासकीय मका खरेदीसाठी प्रशासन व संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:43 IST2017-11-28T16:35:40+5:302017-11-28T16:43:45+5:30
जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते मका खरेदीचा शुभारंभ, मात्र त्यानंतर एकाही शेतकऱ्याकडून मका खरेदी नाही

जामनेरला शासकीय मका खरेदीसाठी प्रशासन व संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक
आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.२८ : शासकीय मका खरेदी केंद्रावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुभारंभ केल्यानंतर एकाही शेतकऱ्याचा मका पूर्णपणे मोजला गेलेला नाही. पणन महासंघ ग्रेडर देत नाही, शासन मोजलेला मका स्विकारत नसल्याने खरेदी ठप्प झाली आहे. मका विक्रीसाठी आणलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
गेल्या २० नोव्हेंबरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते मका खरेदीचा शुभारंभ झाला. आठ दिवसात फक्त चार शेतकऱ्यांना मका घेऊन येण्याचे सांगण्यात आले. यापैकी एकाही शेतकऱ्यांची मक्याची पूर्णपणे मोजणी झालेली नाही. मक्याची आर्द्रता मोजल्यानंतर १४ पेक्षा जास्त असल्यास तो बाजुला ठेवला जातो. आर्द्रता कमी करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात सुकवून आणल्यानंतर देखील ग्रेडींग करण्यासाठी पणन महासंघाचा ग्रेडर येत नसल्याने खरेदी बंद पडली आहे.
शेतकरी संघाने शुभारंभानंतर आठ दिवसात मोजणी केलेला २३९ क्विंटल मका स्विकारायला शासनाचे प्रतिनिधी तयार नसल्याने व ग्रेडर येत नसल्याने मोजणी बंद ठेवल्याची माहिती केंद्रावरील उपस्थित संघाच्या कर्मचाऱ्याने दिली.
दरम्यान, पणन महासंघात संपर्क साधला असता या कार्यालयातील पाटील यांनी सांगितले की, शेतकरी संघानेच मक्याची आर्द्रता तपासून ग्रेडींग करावी असे कळविण्यात आले आहे. शासनाच्या आदेशात देखील तसे म्हटले आहे.
गेल्या मंगळवारपासुन २५० क्विंटल मका घेऊन केंद्रावर थांबून आहेत. मोजणी होत नसल्याने त्रस्त झालो आहोत. मक्याची आर्द्रता नियमापेक्षा कमी आहे. केवळ ग्रेडर नाही व शासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. व्यापारी कमी भावाने खरेदी करीत असल्याने नुकसान होते, तर शासन हमी भावाने खरेदी करण्याचे सांगत असले तरी केंद्रावर मात्र अडवणूक सुरुच आहे. त्रुटी दूर करुन तातडीने मोजणी केली जावी.
- देवानंद सरताळे, शेतकरी, वाघारी, ता. जामनेर.
खरेदी केंद्रावर आलेला मका मोजणे हे काम शेतकरी संघाचे आहे. ग्रेडर नियुक्त करण्याचे काम पणन विभागाचे आहे. याबाबत त्यांचेशी पत्रव्यवहार केलेला आहे. शेतकऱ्यांनी आणलेला मका चांगला आहे. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे मोजणी करु शकत नाही याचे दु:ख वाटते.
-चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर.