कृषी, सिंचन प्रश्नांवर निवडणूक झाली केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:50 IST2019-04-08T14:50:29+5:302019-04-08T14:50:40+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या प्रभावशाली मंत्र्यांच्या कृषी आणि सिंचन या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रान पेटविण्याचा विचार महाआघाडीचा दिसून येत आहे. शरद पवार यांच्या एरंडोल येथील सभेत प्रमुख भर हा या दोन प्रश्नांवर दिसूून आला. आणि जनतेचा मोठा प्रतिसाद यावेळी या दोन्ही प्रश्नांना मिळाला. निवडणूक या दोन विषयांभोवती केंद्रित करण्याचा विचार आता महाआघाडी करीत असणार.

Elections on Agriculture, Irrigation Questions | कृषी, सिंचन प्रश्नांवर निवडणूक झाली केंद्रित

कृषी, सिंचन प्रश्नांवर निवडणूक झाली केंद्रित

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नावर रान पेटविण्याचा महाआघाडीचा प्रयत्न अंतर्गत विरोधातून सावरताना भाजपची त्रेधातिरपीट; शिवसेनेच्या ‘कभी हां कभी ना’ भूमिकेने वाढविली चिंता

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत राफेल, राम मंदिर, एयर स्ट्राईक, गरिबांना ७२ हजार रुपये हे मुद्दे किती प्रभावशाली ठरतात, याचा अंदाज घेण्याचे काम सध्या रालोआ आणि महा आघाडीचे रणनितीकार करीत आहे. परंतु, खान्देशचा विचार केला तर कृषी आणि सिंचन या विषयांभोवती ही निवडणूक फिरु शकते, असे म्हणता येईल. केंद्र व राज्य सरकारातील भाजपच्या पाच वर्षांच्या काळात खान्देशातील शेती, प्रक्रिया उद्योग आणि सिंचन व्यवस्था या आघाडीवर समाधानकारक काम झालेले नाही. पहिल्या युती सरकारच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजची कामे सुरु झाली. परंतु, काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आणि युतीच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात बॅरेजेसचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत काही पोहोचले नाही. उपसा सिंचन योजना पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली झाल्या, पण त्यातून पाणी बांधापर्यंत गेले नाही.
धुळे जिल्ह्यात सुलवाडे-जामफळ आणि अक्कलपाडाचे पाणी धुळे शहरासाठी आणण्याच्या योजनेविषयी पाच वर्षांत काही झाले नाही. आणि आता निवडणुकीपूर्वी कामे मंजूर केली असली तरी जनता त्यावर किती विश्वास ठेवेल, हा प्रश्न आहेच.
तीच स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या २५ वर्षांपासून तापी नदीवरील मेगा रिचार्ज योजना आणि गिरणा नदीवरील सात बलून बंधारे या दोन महत्वाकांक्षी योजनांचे राजकारण करीत भाजपने सत्ता उपभोगली. मात्र सत्ता येऊनही पाच वर्षात मंजुरी, सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल या पलिकडे हे काम गेलेले नाही. धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या निम्म्या भागासाठी जिव्हाळ्याचा प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाविषयी तर पाच वर्षात उदासिनता दिसून आली. हा प्रश्न सातत्याने लावून धरणारे साहेबराव पाटील ‘भाजप’मध्ये जाऊनही हा प्रकल्प जैसे थे आहे. वरखेडी-लोंढे प्रकल्पाची तीच स्थिती आहे. नार-पार योजनेचा लाभ, नदी जोड हे विषय यंदा गाजतील, असे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ्यात दुष्काळाचा दाह माध्यमांच्या विषयपत्रिकेवरुन दूर झाला असला तरी उमेदवारांना प्रचार करताना ग्रामीण भागात तो जाणवत आहे. मतदार आता बेधडकपणे प्रश्न विचारत आहे. कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान, पीकविमा, वादळ-गारपीटीची नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई यासोबत खरेदी केंद्रांवर झालेली अडवणूक, बाजार समित्यांचे धोरण, महसूल विभागाकडून आॅनलाईनच्या नावाने होत असलेली अडवणूक या विषयांनी जनता त्रस्त झाली आहे.
खासदार, आमदार या नात्याने या सर्वपक्षीय मंडळींनी पाच वर्षे काम केलेले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा केली जात आहे.
‘संकटमोचक’ म्हणून महाराष्टÑभर ख्यातीप्राप्त झालेल्या गिरीश महाजन यांची त्यांच्याच जिल्ह्यात कोंडी करण्याचा प्रयत्न महाआघाडीने चालविला आहे. उत्तर महाराष्टÑातील आठ जागा निवडून आणण्याचा विडा महाजन यांनी उचलला आहे. परंतु, खान्देशातील चार जागांचा विचार केला तर लढाई पूर्वी वाटत होती, तेवढी सोपी राहिलेली नाही, हे निश्चित. एकनाथराव खडसे हे मुंबईत रुग्णालयात दाखल असल्याने रावेरमध्ये त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. जळगावात प्रचाराला उशिरा सुरुवात झाली आहे. धुळ्यात अनिल गोटे उपद्रव करतील. नंदुरबारात नटावदकरांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

Web Title: Elections on Agriculture, Irrigation Questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव