चार पलटी व शंभर फूट खोल ट्रक कोसळूनही चालक सुखरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 19:41 IST2021-01-10T19:39:30+5:302021-01-10T19:41:01+5:30
महामार्गावर बांभोरी पूलानजीकची घटना

चार पलटी व शंभर फूट खोल ट्रक कोसळूनही चालक सुखरुप
जळगाव : समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने ट्रकने तीन पलट्या घेतल्या, त्यात शंभर फूट खोल जावून ट्रक थांबला. इतकी भयंकर घटना घडल्यानंतरही केवळ दैव बलवत्तर म्हणून की काय चालकाला जराही खरचटले नाही. राजू माळी (रा.पाळधी, ता.धरणगाव) असे सुखरुप बचावलेल्या चालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी साडे आठ वाजता राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी जकातनाक्याजवळ हा अपघात झाला.
या घटनेबाबत घटनास्थळावरील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी येथील सोपाळ कोळी यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र.एम.एच. ०४ सी.यु २२८८ ) राजू माळी हा तरुण चालक आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता ट्रक जळगावहून पाळधीकडे जात होता. यादरम्यान बांभोरी जकातनाक्यापासून काही अंतरावर समोरुन येणार्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात तसेच ब्रेक न लागल्याने चालक राजू माळी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रक थेट शंभर फूट खोल असलेल्या दरीत कोसळला. यावेळी पाच ते सहा झाडे तुटली. या घटनेत माळी याला अगदी किरकोळ दुखापत झाली असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहेत.
पाच तासानंतर बाहेर काढला ट्रक
तीन ते चार वेळा पलटी घेतल्यानंतर हा ट्रक एका ठिकाणी झाडात अडकला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह बांभोरी येथील तरुण तसेच नागरिकांनी धाव घेतली. वाहनधारक तसेच बांभोरी येथील तरुण यांच्या मदतीने अडकलेला ट्रक खाली नेण्यात आला. तत्पूर्वी ट्रकमधील चालक राजू माळी यास ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तसेच बांभोरी तरुण, वाहनधारक यांच्या अथक परिश्रमाने तब्बल पाच तासानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक बाहेर काढण्यात यश आले.