शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ!
स्टार - ११६०
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही वर्षांपूर्वी डीएड प्रवेशासाठी अर्ज करूनही यादीत नाव येते की नाही, याची प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, शिक्षक घडविणाऱ्या महाविद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील २१ कॉलेजमध्ये १०४० जागांसाठी केवळ ४४५ अर्ज आले आहेत. त्यामुळे डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा सीईटी देणे अनिवार्य असते. दरम्यान, सीईटी देऊनही नोकरीसाठी वेटिंगच करावी लागत असल्याने डीएडला प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेशच होत नसल्याने काही डीएड कॉलेज बंद करण्याची वेळ संस्थाचालकांवर आली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. नुकतीच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यात १०४० जागांसाठी केवळ ४४५ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ४२२ विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरले आहेत.
नोकरीची हमी नाही...
-डीएड केल्यानंतर नोकरीसाठी पैशांची मागणी होते. अनेकांची परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.
- भरती बंद असल्याने अनेक जणांना शाळेवर कंत्राटी तत्त्वावर काम करावे लागते. अल्प मानधन मिळते.
- सद्य:स्थितीत भरती नाही, नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे.
म्हणून इतर अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश...
गेल्या सात ते आठ वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, ती पण रखडली गेली़ त्यात अनेक शिक्षक कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून त्यांना तुटपुंजे मानधन मिळत आहे़ त्यामुळे डीएडला प्रवेश न घेता बीएस्सीला प्रवेश घेतला आहे.
- गणेश कोळी, विद्यार्थी
००००००
कित्येक पात्र उमेदवार शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत़ दुसरीकडे शासनाकडून कुठलीही हालचाल होत नाही़ स्पर्धा जास्त असल्याने डीएडऐवजी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. अभियांत्रिकी झाल्यावर कोणत्याही कंपनीत नोकरी लागू शकते.
- आनंद कदम, विद्यार्थी
०००००००
प्राचार्य म्हणतात...
डीएड महाविद्यालयांवर आलेली ही वेळ लवकरच जाईल. पुन्हा आधीसारखे मेरिटप्रमाणे प्रवेश होतील, अशी आशा आहे. त्याचे कारण असे की चाळीस हजार शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे़ विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करावी. आज ज्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यांना पुढे भविष्य चांगले आहे.
- सुवर्णा चौधरी, प्राचार्य, अध्यापिका विद्यालय
=============
जिल्ह्यातील डीएड कॉलेज : २१
एकूण जागा : १०४०
आलेले अर्ज : ४४५
प्रवेशाला पात्र : ४२२