वादळी वारा आणि पावसामुळे कु-हे (पानाचे) परिसरात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:19 IST2018-09-21T16:16:00+5:302018-09-21T16:19:03+5:30
कु-हे (पानाचे) परिसरात १९ रोजी अवघे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वादळी वारा आणि पावसामुळे कु-हे (पानाचे) परिसरात नुकसान
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कु-हे (पानाचे) परिसरात १९ रोजी अवघे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी सूचना जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिली. त्यानंतर तलाठी पाटील व कृषी सहायक पवार यांनी कु-हे पानाचे येथे जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
१९ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास कु-हे पानाचे परिसरात जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला. कपाशी, मका, पानमळे आदी पिके उद्ध्वस्त झाली. झाडे उन्मळून पडली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी गुरुवारी नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जि.प.चे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, माजी सरपंच भगवान धांडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, माजी सदस्य भुवन शिंदे, विद्यमान सदस्य नारायण कोळी, माजी सदस्य किशोर वराडे, श्याम बडगुजर, बंडू वराडे, जीवन पाटील, डॉ.रमाकांत पाटील, जनार्दन गांधेले, योगेश गांधेले, सुभाष पाटील, नाना महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सावकारे यांनी तहसीलदार थोरात यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून नुकसानीसंदर्भात चर्चा केली. पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तहसीलदार थोरात यांनी तलाठी सुरेश पाटील, कृषी सहायक पवार यांना नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. लवकरच पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.