शिरसोली : बारी समाज माध्यमिक विद्यालयात प्रथमच कोविशिल्ड लसीचे दोन हजार डोस प्राप्त झाल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नियोजनामुळे लसीकरण शांततेत पार पडले.
शिरसोली प्र. नं. येथील बारी समाज माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत प्र. नं. यांच्या संयुक्त विद्यमाने बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आरोग्य विभागाने प्रथमच दोन हजार कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करुन दिले होते. मोठ्या प्रमाणात आलेल्या लसींचे डोस वाया न जाता ती सर्व नागरिकांना मिळावी म्हणून ग्रामपंचायत सदस्य व शाळेतील शिक्षकांनी नियोजन करुन शाळेच्या प्रांगणात सात बूथ तयार केले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत ७०० जणांनी लस घेतली. सरपंच हिलाल भिल्ल, उपसरपंच सखूबाई पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील दांडगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , बारी समाज शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे, उपमुख्याध्यापक सुरेश बारी, शिक्षक यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. सागर नाशिककर, डॉ. प्रशांत गर्ग, अनिल महाजन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह ८० आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे जितेंद्र राठोड यांनी बंदोबस्त ठेवला.
आतापर्यंत आठ हजार जणांनी घेतली लस
शिरसोली प्र.बो. व प्र. नं. या ४० हजार लोकवस्तीच्या गावात आतापर्यंत आठ हजार नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. अशाच प्रकारे नियमित मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास संपूर्ण गावाचे लसीकरणास वेळ लागणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.