कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा देखील मिरवणुकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट तर, घरगुतीसाठी २ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही रिंगरोडवरील एलआयसी कॉलनीतील राजेंद्र राणा यांनी सात फूट उंचीची मूर्ती तयार केली. बळीराम पेठेतील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याच मूर्तीची टॉवर चौकापासून वाजतगाजत मिरवणूक काढून स्थापना केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गोपनीयचे सहायक फौजदार भरत प्रल्हादसिंग पाटील व नरेंद्र अशोक ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे नरेंद्र ठाकरे यांनीच सरकारतर्फे फिर्याद दिली, त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शासनाच्या नियमाबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच मूर्तिकारांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती, तरी देखील नियमांचे उल्लंघन झाले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मूर्तिकाराविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST