जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:17 IST2026-03-10T19:58:50+5:302026-03-10T20:17:09+5:30

उन्मेष पाटलांच्या शिंदेसेनेतील प्रवेशावरुन मित्रपक्ष भाजपमध्ये पसरली नाराजी

Cracks in Mahayuti BJP Fumes Over Unmesh Patil Entry into Shinde led Shiv Sena in Jalgaon | जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र

जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र

जळगाव : जिल्ह्यात महायुतीमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरल्याचे चित्र आहे. उद्धव सेनेतून थेट शिंदे सेनेत आलेल्या पाटील यांच्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत विरोधाची धार तीव्र झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

उन्मेष पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टोकाची टीका केली होती. त्यातच शिंदे सेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये त्यांनी 'भाजप' हाच मुख्य अजेंडा असल्याचे आपल्या कार्यकर्त्याला सांगितल्याचे समोर आले. यामुळे भाजपमधील एका गटात तीव्र संताप व्यक्त होत असून, पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी या नाराजीला दुजोरा दिला आहे.

एकाचा प्रवेश रोखला, दुसऱ्याचा का केला? 

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील एक मोठा नेता भाजपमध्ये येणार होता, मात्र त्यावेळी शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून आक्षेप घेतल्यामुळे भाजपने तो प्रवेश थांबवला होता. 'आम्ही मित्रधर्माचे पालन केले, मात्र शिंदे सेनेने उन्मेष पाटलांना प्रवेश देऊन आम्हाला नाराज केले,' अशी भावना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी  व्यक्त केली.

शिंदे सेनेची 'स्ट्राइक रेट' वाढवण्याची रणनीती 

ताकद नसलेल्या ठिकाणी मजबूतीकरण: जिल्ह्यातील ११ पैकी ५ आमदार सध्या शिंदेसेनेचे आहेत. ज्या मतदारसंघांत पक्षाची ताकद कमी आहे, तिथे दुसऱ्या पक्षातील बडे नेते पक्षात घेऊन संघटना मजबूत करण्याची रणनीती शिंदेसेनेने आखली आहे. 

अमळनेर पॅटर्न : माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रवेशामुळे अमळनेर नगरपालिकेत शिंदेसेनेचा नगराध्यक्ष बसवण्यात यश आले.

चाळीसगाव मिशन : चाळीसगावमध्ये पक्षाचे संघटन कमी असल्याने आता उन्मेष पाटलांच्या माध्यमातून आगामी जि.प. निवडणुकांची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.

आता रावेर आणि जामनेरवर लक्ष? 

शिंदेसेनेच्या विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ, रावेर आणि जामनेर या तीन मतदारसंघांपैकी रावेर आणि जामनेरमध्येही काही बड्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी शिंदे सेनेकडून गुप्त हालचाली सुरू आहेत. शिंदे सेनेच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे आगामी काळात महायुतीमध्ये वर्चस्वाचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title : जलगांव: उन्मेष पाटिल की एंट्री से महायुति में तनाव, भाजपा कार्यकर्ता नाराज

Web Summary : उन्मेष पाटिल के शिंदे सेना में प्रवेश से जलगांव भाजपा में आक्रोश है। भाजपा नेताओं को दरकिनार महसूस होने से आंतरिक विवाद बढ़ गया है। शिंदे सेना का लक्ष्य अपनी स्थिति मजबूत करना है, जिससे महायुति में सत्ता संघर्ष बढ़ सकता है।

Web Title : Jalgaon: Mahayuti Tensions Rise as Unmesh Patil's Entry Angers BJP

Web Summary : Unmesh Patil's entry into the Shinde Sena sparks anger within Jalgaon BJP. Internal disputes intensify as BJP leaders feel sidelined. Shinde Sena aims to strengthen its base, potentially escalating Mahayuti power struggles.