कोरोना नंतर पाचोरा मुख्याधिकारी पुन्हा ॲक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:59 IST2021-04-12T17:58:44+5:302021-04-12T17:59:35+5:30
नियम न पाळणाऱ्या विविध दुकानांकडे ३७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कंबर कसली आहे.

कोरोना नंतर पाचोरा मुख्याधिकारी पुन्हा ॲक्शन मोडवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : पाचोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर ॲक्शन मोडवर येत शहरात कोरोना नियम न पाळणाऱ्या विविध दुकानांकडे ३७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करत पुन्हा एकदा कोरोना विरोधात कंबर कसली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार जमावबंदी व संचार बंदीचे आदेश जारी केलेले असताना पाचोरा नगरपरिषदेच्या क्षेत्रामध्ये विना मास्क वावरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे, सुरू असलेले दुकाने व आस्थापना येथील कर्मचारी यांची कोरोनाची चाचणी न करणे, अनाधिकृतपणे दुकाने व आस्थापना उघडणे याकरिता शहरातील विविध दुकानदारांना दंड आकारत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर आणि त्यांच्या पथकाने धडक कारवाई राबवून हा दंड वसूल केला तर शहरातील कस्तुरी गिफ्ट हाऊस या दुकानाला सील केले.
नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याद्वारे संयुक्तरित्या झालेल्या या कारवाईत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे समवेत प्रशासकीय अधिकारी पी. डी. भोसले, कर अधीक्षक डी. एस. मराठे, पी. एस. आय. दत्तात्रय नलावडे, पीएसआय विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागातील दीपक सुरवाडे, बापू महाजन, नितीन सूर्यवंशी, प्रकाश पाटील, विश्वास देशमुख, विजयसिंह पाटील, प्रकाश पवार, महेंद्र गायकवाड, अनिल वाघ, प्रशांत खंडारे यांनी ही कारवाई केली.
नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये तसेच दुकाने आणि आस्थापना येथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.