कजगाव येथील डाॅक्टरांच्या गाडीला अपघात, चाैघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:25 IST2021-02-01T15:24:57+5:302021-02-01T15:25:37+5:30

कजगावच्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले आहे.

Chaighe injured in Kajgaon doctor's car accident | कजगाव येथील डाॅक्टरांच्या गाडीला अपघात, चाैघे जखमी

कजगाव येथील डाॅक्टरांच्या गाडीला अपघात, चाैघे जखमी

ठळक मुद्देचाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

कजगाव, ता. भडगाव : पाचोरा येथून कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या कजगावच्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले आहे. जखमींवर चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कजगाव येथील डॉ. संजय पाटील हे दि. ३० रोजी संपूर्ण कुटुंबासह पाचोरा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशिरा कजगावकडे येत असताना पाचोरा-भडगाव मार्गावर बांबरुड फाट्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात मालवाहू गाडीने कट मारल्यामुळे डॉक्टरांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडीने पलटी घेत ती समोरील झाडावर आदळली. अपघातात गाडी चक्काचूर झाली. मुलगा राजवीर याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर पत्नी वसुधा पाटील यांनादेखील फ्रॅक्चर झाले.

डॉ. संजय व मुलगी अनुष्का हे दोघे जखमी झाले. गाडीत असलेला संपूर्ण परिवार गंभीर जखमी अवस्थेत पलटी झालेल्या गाडीत अडकून पडले होते. दरम्यान, बाहेर निघाल्यानंतर चारही जखमींना पाचोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मुलीची हिंमत भारी...

गाडी अचानक दोन पलटी घेत झाडावर आदळल्याने गाडीचे सारे दरवाजे लॉक झाले होते. अचानक झालेल्या अपघातामुळे सारेच बेशुद्ध पडले. दरम्यान दहा वर्षीय मुलगी अनुष्का ही शुद्धीवर आल्यानंतर गाडीची काच फोडत ती बाहेर पडली. नंतर वडिलांना हात देत सहारा देत बाहेर काढले. तिच्या हिमतीमुळेच साऱ्या जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल होता आले. तिच्या हिमतीमुळेच पुढील अनर्थ टळला.

Web Title: Chaighe injured in Kajgaon doctor's car accident