जळगावात डॉ.दोशींच्या बंगल्यातील लुटीचा १० तासात पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:29 IST2018-09-10T15:25:41+5:302018-09-10T15:29:56+5:30
गांधीनगरात डॉ. दोशी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी शनिवारी भरदुपारी दरोडा टाकला होता. या घटनेचा १० तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जळगावात डॉ.दोशींच्या बंगल्यातील लुटीचा १० तासात पर्दाफाश
जळगाव : शहरातील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. नरेंद्र दोशी यांच्या पत्नी भारती दोशी (वय ७२) यांचे हातपाय बांधून व तोंड दाबून गांधीनगरातील त्यांच्या बंगल्यातील रोकडसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटण्याचा कट मोलकरीण यशोदाबाई सिघप्पा गवळी (वय ४०, रा.पळासखेडा, ता.जामनेर) हिनेच रचल्याचे उघड झाले असून तिचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांनी ही लूट केली आहे. या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
गांधीनगरात डॉ. दोशी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी शनिवारी भरदुपारी दरोडा टाकला होता. या घटनेचा १० तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दोन लाख रुपये व दागिने जप्त
सिघू बाळ गवळी (वय २७), देवानंद प्रकाश कोळी (वय २७), भरत शंकर गवळी (वय २८) व यशोदाबाई सिघप्पा गवळी (वय ४०) सर्व रा. पळासखेडा, ता.जामनेर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख, ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ बांगड्या, १० ग्रॅमची एक सोन्याची पोत, पासपोर्ट व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.