भुसावळात चोऱ्यांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST2021-07-31T04:16:54+5:302021-07-31T04:16:54+5:30
भुसावळ : शहरात चोरांकडून घर आणि दुकानांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी काही दिवसातच तिसऱ्यांदा मोठी चोरी केली ...

भुसावळात चोऱ्यांचे सत्र सुरूच
भुसावळ : शहरात चोरांकडून घर आणि दुकानांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी काही दिवसातच तिसऱ्यांदा मोठी चोरी केली आहे. गुरुवारी रात्री अशोका हार्डवेअरच्या पाठीमागील वरच्या खिडकीतून संलग्न असलेल्या दोन दुकानात प्रवेश करून तब्बल आठ ते दहा लाखांचा माल लंपास करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, आठवडे बाजारातील चुडी मार्केट समोर जितेंद्र बलराम अहुजा यांच्या मालकीचे अशोका हाडवेअर आहे. ते सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुकान उघडून आत गेले असता आतील सामान अस्ताव्यस्त करण्यात आला असल्याचे दिसून आले. यावेळी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला असल्याचे निदर्शनास आले.
गुरुवारी रात्री चोरांनी या दुकानातून पितळाचे कडी व कोंडे, पाण्याचे नळ, पीव्हीसी पाईप, कटर ब्लेड, तसेच कटर मशीन वेगवेगळ्या मशीन यासह बांधकामासाठी लागणारे साहित्य असे एकूण ८ ते १० लाखांचे साहित्य लंपास केले आहे. यावेळी चोरट्याने सीसीटीव्हीचे डीव्हीआरदेखील लंपास केले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असताना बाजारपेठेतील बंद असलेली दुकाने पाहून चोऱ्यांचे सत्र वाढले होते. मात्र आता अनलॉक नंतरही बाजारात चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मागील एप्रिल महिन्यामध्ये उपविभागीय पोलीस अधीक्षकांनी व्यापारी संघटनांसोबत चर्चा करून व्यापारी तसेच पोलीस मित्र असे मिळून रात्रीची गस्त करण्यासाठी रचना आखली होती. परंतु आज रोजी ही गस्तच होत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.