सहा अधिकाऱ्यांचा भार एका निरीक्षकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:19+5:302021-04-23T04:17:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरापासून सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असल्याने सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत ...

The burden of six officers on one inspector | सहा अधिकाऱ्यांचा भार एका निरीक्षकावर

सहा अधिकाऱ्यांचा भार एका निरीक्षकावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिनाभरापासून सर्वत्र रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असल्याने सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहे. मात्र, जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा कायम आहे. सध्याचे औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव हे एकमेव औषध निरीक्षक सद्य:स्थितीत कार्यरत असून त्यांच्यावर सहा अधिकाऱ्यांचा भार आहे. तसेच आता रेमडेसिविर इंजेक्शनसाठी थेट धमकीचेच संदेश येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पत्र देऊन व्यथा मांडली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून रेमडेसिविरच्या बाबतीत प्रचंड आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत औषध निरीक्षक माणिकराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यात जिल्ह्यात आमचे एकमेव कार्यालय असून जिल्ह्यासाठी मी एकमेव पूर्णवेळ औषध निरीक्षक असून १७ एप्रिलपासून सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. रेमडेसिविरचा तुटवडा बघता एकाच वेळी सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्यच नाही. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक, रुग्ण, राजकीय संघटनेचे अध्यक्ष व इतर यांना रेमडेसिविर प्राप्त न झाल्यास आपल्या भ्रमणध्वनीवर अर्वाच्च भाषेत, धमकीचे संदेश पाठवून रोष व्यक्त करीत आहेत. यामुळे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याने काम करण्यास अडचणी येत असल्याचे अनिल माणिकराव यांनी पत्रात नमूद केले असून, त्यांनी १६ एप्रिल रोजी हे पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे.

ऑक्सिजनची महत्त्वाची जबाबदारी

आपला मोबाइल क्रमांक हा सार्वजनिक झाला असून, दिवसभरात शेकडो कॉल येत असतात, अशा स्थितीत ऑक्सिजनसंदर्भातील महत्त्वाच्या कामाबाबतच्या संपर्कावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत ही मोठी जबाबदारी असल्याचे माणिकराव यांनी म्हटले आहे.

Web Title: The burden of six officers on one inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.