ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट, तपासात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:48 IST2025-11-12T11:48:17+5:302025-11-12T11:48:57+5:30

गाडी भुसावळ स्थानकावर ८.३० वाजता दाखल होताच संपूर्ण गाडी, डबे, सामान ठेवण्याच्या जागा व प्रवाशांचे बॅग तपासण्यात आल्या

'Bomb' message in Mahanagari Express in the name of ISI Pakistan; High alert at railway stations, investigation underway | ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट, तपासात...

ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट, तपासात...

राकेश कोल्हे

भुसावळ (जळगाव): वाराणसीहून मुंबईकडे येणाऱ्या महानगरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२१७८) मध्ये ‘बॉम्ब’ असल्याचा संशयास्पद संदेश व देशविरोधी मजकूर आढळल्याने बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) मध्य रेल्वे मार्गावर मोठी खळबळ उडाली. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘ISI’ अशा दहशतवादी संघटनांचा उल्लेख करणारा हा मजकूर एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातील शौचालयात लिहिलेला आढळला.

भुसावळ स्थानकात गाडी येण्यापूर्वीच एका प्रवाशाला हा मजकूर दिसला. त्याने तत्काळ ही माहिती गार्डला दिली. गार्डने ती सुरक्षा विभागाला कळविल्यानंतर भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस व श्वान पथक तातडीने दाखल झाले. गाडी भुसावळ स्थानकावर ८.३० वाजता दाखल होताच संपूर्ण गाडी, डबे, सामान ठेवण्याच्या जागा व प्रवाशांचे बॅग तपासण्यात आल्या. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने कसून झडती घेतली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर गाडीची तपासणी पूर्ण करून गाडी पुन्हा ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडे रवाना करण्यात आली.

या घटनेनंतर भुसावळसह जळगाव, नाशिक, मनमाड आणि मुंबई विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. हा संदेश केवळ खोडसाळपणाचा प्रकार आहे की, त्यामागे काही गंभीर कटकारस्थान दडले आहे, याचा तपास सुरू असून, रेल्वे व पोलिस विभागाने सायबर तज्ञांच्या मदतीने चौकशी सुरू केली आहे.

Web Title: 'Bomb' message in Mahanagari Express in the name of ISI Pakistan; High alert at railway stations, investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.