भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘योग्य वेळ’ एकनाथराव खडसेंनी ठोकरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:02 IST2018-07-28T13:01:08+5:302018-07-28T13:02:28+5:30
जळगावात नाराजी व्यक्त होताच गुंडाळली पत्रपरिषद

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘योग्य वेळ’ एकनाथराव खडसेंनी ठोकरली!
जळगाव- मनपा निवडणुकीनिमित्त आयोजित भाजपाच्या पत्रपरिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, योग्य वेळ आल्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना नक्कीच न्याय दिला जाईल. परंतु दानवे यांच्या या उत्तरानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांंनी लगेच सांगितले की, तशी योग्य वेळ येणारच नाही... खडसे यांच्या वक्तव्यातून जाहीरपणे नाराजी व्यक्त झाल्याने पत्रपरिषद आटोपती घेण्यात आली.
शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीत दानवे यांच्या हस्ते भाजपाच्या मनपा निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशनही झाले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची मुख्य उपस्थिती होती.
याचबरोबर सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु आहे का? असे विचारले असता दानवे यांनी असे कोणतेही वारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. तर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल अशीही चर्चा असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यावर या प्रश्नांची उत्तरे देणे मी जरुरी समजत नाही, असे सांगून दानवे यांनी पत्रपरिषद गुंडाळली.
तत्पूर्वी खडसे समर्थकांनी दानवे यांना खडसे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना घेरले. त्यांचे म्हणणे दानवे यांनी समजून घेतले.
खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपानंतर भाजपाने त्यांना मंत्रीपदावरुन दूर केले. दरम्यानच्या काळात अॅन्टी करप्शन ब्युरो आणि चौकशी समितीचीही क्लीन चिट खडसे यांना मिळाली. यानंतरही मात्र खडसे यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. पक्षातर्फे नेहमीच सांगण्यात आले की, योग्य वेळी खडसेंना संधी दिली जाईल.. न्याय दिला जाईल... परंतु न्याय मिळालाच नाही. आणि आजही तेच उत्तर मिळाल्याने खडसे यांनी नाराजीने ‘ती’ वेळ कधीच येणार नाही, असे स्पष्टपणे पत्र परिषदेतच वक्तव्य केले.