भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 05:36 IST2025-03-03T05:35:04+5:302025-03-03T05:36:11+5:30
लोकप्रतिनिधीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुक्ताईनगर (जि. जळगाव) : एक उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजपच्या नेत्याच्या कन्येची व तिच्या मैत्रिणींची जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई यात्रोत्सवात काही जणांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रविवारी सात जणांवर मुक्ताईनगर पोलिसांत आयटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात किरण माळी (२१) आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे.
आरोपींना हटकणाऱ्या सुरक्षारक्षक पोलिसालाही दमदाटी केली होती. त्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला. संशयितांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी मुलींसह रविवारी सकाळी मुक्ताईनगर ठाणे गाठले होते.
यात्रोत्सवात काही तरुणांनी या मुलींचा पाठलाग केला. मुली पाळण्यात बसल्या असताना त्यांची छेडछाड केली. मोबाइलमध्ये व्हॉट्सॲप कॉलसह चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार आहे. एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता ७५(१), ७८(२), ७९,१८९ (२), पोक्सो ॲक्ट ८, १२ आयटी ॲक्ट ६६(इ) कलमान्वये मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसात आरोपींविरुद्ध पोक्सो व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक तर स्थानिक पोलिसांची दोन अशी तीन पथके रवाना झाली आहेत.
पीडितेची ओळख उघड करणार नाही 'लोकमत'
या प्रकरणात पीडितेची ओळख उघड न करण्याच्या भूमिकेशी 'लोकमत' कटिबद्ध आहे. कारण, पीडित मुलगी अल्पवयीन आहे आणि या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 'लोकमत' महिलांची गोपनीयता आणि कायद्याचा सन्मान करते.
कोणीही असले तरी कारवाई होणारच : मुख्यमंत्री
कुठल्याही नेत्याने कारवाई करू नका असे म्हटलेले नाही. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे प्रकार खपवून घेणार नाही. कोणीही असले तरी कारवाई होणार आणि केलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, या छेडछाड प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
त्यांना जरब बसायला हवी
हा फक्त आमच्या मुलीचाच प्रश्न नाही तर मुलींच्या सुरक्षिततेचा विषय आहे. मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना जरब बसायला हवी. त्यासाठी आपण स्वतः मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेलो अशा भावना पीडित मुलीच्या पालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.
आरोपीला विचारला जाब
या प्रकरणात शिंदेसेनेच्या एका माजी नगरसेवकाचाही आरोपींमध्ये समावेश आहे. त्याला पीडितेच्या पालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी फोन करून जाब विचारल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.