सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वकिलाला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:10 IST2018-07-25T22:09:19+5:302018-07-25T22:10:57+5:30
मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने वकिलाला बदडले
जळगाव : मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली. दरम्यान, या घटनेची तालुका पोलीस स्टेशनच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलने सुरु आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. आंदोलन व जलसमाधी या दोन्ही मुद्यावर या वकीलाने सोशल मीडियावर मंगळवारी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही तरुण व महिलांनी मंगळवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान वकीलाचे घर गाठून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे बीट मार्शल हे तातडीने दादावाडीत पोहचले, मात्र प्रकरण गंभीर असल्याने सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व त्यापाठोपाठ पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटविला.