दवाखान्यातून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 23:27 IST2021-06-29T23:27:29+5:302021-06-29T23:27:56+5:30
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपीस दोघा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

दवाखान्यातून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपीस चाळीसगाव डी. बी.च्या भूषण पाटील, सतिष राजपूत या दोघा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
आरोपी शंकर रविंद्र चौधरी (२४, शिव कॉलनी चाळीसगाव) हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असताना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २६ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या चौथ्या माळ्यावरून जाळी तोडून फरार झाला होता, तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डीबीचे पो. कॉ. भूषण पाटील, सतिश राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि. २९ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंटजवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे.
या घटनेत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल अहिरे, पो. कॉ. शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.