जळगाव : गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून जिल्ह्यावर असलेल्या आभाळमायेमुळे जलसाठे तुडुंब भरलेेले आहेत. जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणारे वाघूर धरण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आठ तालुक्यांत तर १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून गिरणा धरणानेही पन्नाशी ओलांडून ते ५५.३२ टक्के भरले आहे. या सोबतच जळगाव शहरवासीयांचे आकर्षण असलेला मेहरूण तलावदेखील ९० टक्के भरला असून त्यात अजूनही आवक सुरूच आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यासह पर्यटनाचा आनंद यामुळे द्विगुणित होत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. त्यात दोन महिन्यात केवळ ३.३३ टक्के वाढ होऊन ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर जलसाठ्यात वाढ होऊ लागली. त्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे तर आणखी वेगाने वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ६४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
१२ दिवसांत वाघूर साठ्यात ३३ टक्क्यांनी वाढ
जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात १ सप्टेंबरपासून ते १२ सप्टेंबर या १२ दिवसांत तब्बल ३२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रविवार, १२ सप्टेंबर रोजी धरणसाठा ९५.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत धरण १०० टक्के भरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला. त्यातही ८ सप्टेंबर रोजी तर धरणसाठ्यात थेट १२.५१ टक्क्यांनी वाढ होऊन हा साठा ८७.४२ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतरही दररोज दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होत जाऊन हा साठा ९५.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.