वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:36 IST2024-12-07T15:35:45+5:302024-12-07T15:36:19+5:30
'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या," असा आक्रोश त्यांच्या दोन्ही मुलांनी केला अन् उपस्थितांचे डोळे पाणावले.

वाढदिवशीच भीषण अपघातात गमावला जीव; मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले!
Jalgaon Accident ( Marathi News ) : नियती मोठी क्रूर आणि कठोर असते, याचा प्रत्यय भडगाव येथील वाल्मीक पाटील (४९) यांच्याबाबत आला. ५ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी रस्त्यांतील खड्ड्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
वाल्मीक मधुकर पाटील हे आमडदे (ता. भडगाव) येथील साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक शाळेत कर्मचारी होते. मुलांना लागणारी शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी अमळनेर येथे दुचाकीने गेले होते. अमळनेर येथील काम आटोपून सायंकाळी ५ वाजता भडगाव येथे यायला निघाले. कोळगाव येथील नातेवाइकाकडे जायचे असल्याने त्यांनी वाहन कोळगावकडे वळविले. शिंदी ते कोळगावदरम्यान पाटाजवळ खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यात वाल्मीक पाटील यांना डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशीच वाल्मीक पाटील यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. भडगाव येथे आल्यानंतर वाढदिवस साजरा करून ते परिवारासह आमडदे येथे गावाच्या यात्रेला जाणार होते.
मुलांच्या आक्रोशाने गहिवरला जनसमुदाय
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर मूळ गावी आमडदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी 'पप्पा... आपल्याला आमडदे येथे बहिरम बाबांच्या जत्रेला जायचे आहे... लवकर या... राम व कृष्णा या दोन्ही मुलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. वाल्मीक पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन बहिणी, मुले असा परिवार आहे.