पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या वकीलावर काळाची झडप
By सागर दुबे | Updated: March 27, 2023 21:09 IST2023-03-27T21:09:27+5:302023-03-27T21:09:35+5:30
नेहरू चौकात भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक

पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या वकीलावर काळाची झडप
जळगाव : रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या ॲड. योगेश जालमसिंग पाटील (४५, रा.दादावाडी) यांच्या वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौक येथे घडली.
या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, याप्रकरणी कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळचे तमगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील ॲड. योगेश पाटील हे कुटूंबासह दादावाडीत वास्तव्यास होते. सायंकाळी ते त्यांच्या शाहु महाराज कॉम्प्लेक्समधील कार्यालयात असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला म्हणून ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच.१९.सीई.६५११) निघाले होते. कोर्ट चौकाडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात त्यांच्या दुचाकीला रेल्वे स्थानकाकडून टॉवर चौकाकडून निघालेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात ॲड. योगेश पाटील यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जिल्हा रूग्णालयात गर्दी...
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी तत्काळ दुचाकी बाजूला घेवून ॲड. योगेश पाटील यांना जिल्हा रूग्णालयात वाहनातून हलविले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पाटील यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाकेंसह इतर वकील बंधुंनी जिल्हा रूग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.