५० लाखांच्या बंधाऱ्याची वर्षभरातच लागली ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST2021-07-31T04:16:52+5:302021-07-31T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट ...

५० लाखांच्या बंधाऱ्याची वर्षभरातच लागली ‘वाट’
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट व बोगस होऊन वर्षभरातच त्याची वाट लागली आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, जिल्हा परिषदेंतर्गत सिंचन विभागामार्फत २०१९-२० मध्ये चिंचपुरे, ता. पाचोरा येथे बहुळा नदीवर गावालगत ५० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याच्या कामाची तांत्रिक मंजुरी गावापासून काही अंतरावर असताना चुकीच्या ठिकाणी गावालगतच रहिवासी घरांना बाधित होईल अशा नदीच्या वळणावर बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे कामही निकृष्ट प्रतीचे झाल्याने गेल्या वर्षी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने बंधारा भरून पुराचे पाणी रहिवासी घरांकडे शिरून चार रहिवाशांच्या घरांची पडझड झाली. घरातील भांडे सामान वाहून गेले. रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त रहिवाशांना सिंचन विभागाकडून नुकसानभरपाई जाहीर करूनही अद्याप मिळाली नाही. त्यातच हा बंधारा मंजूर जागेऐवजी अन्य ठिकाणी नदीच्या वळणावर बांधल्याने पुराचे पाणी मातीचा भराव तोडून गावात शिरले होते. त्यामुळे ५० लाख रुपये खर्चून बांधलेला सिमेंट बंधारा सिंचन विभागानेच जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ तोडून टाकला. यामुळे ५० लाख रुपये पाण्यात गेले. गावाला बंधाऱ्याचा लाभ तर झालाच नाही उलट गावकऱ्यांचे, गरिबांचे नुकसान झाले आहे. या कामाची थातूरमातूर चौकशी करून सिंचन विभागानेच त्यांच्या संबंधित शाखा अभियंता अनिल पाटील व उपविभागीय अभियंता एस. एल. पाटील यांना वाचविण्याचा प्रयत्न करून शासनाच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
अखेर सिंचन विभागावरच बंधारा तोडण्याची नामुष्की आली. यात दोषी असणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही. याची कसून चौकशी करावी व संबंधितांवर वसुलीची कारवाई करावी, अशी मागणी संबंधित मंत्रालयाकडे केली आहे.
प्रतिक्रिया-
बंधाऱ्यांची झालेली परिस्थिती, घटना खरी आहे यासंदर्भात शाखा अभियंता यांना विचारून माहिती देतो.
एस. एल. पाटील, उपविभागीय अभियंता, सिंचन विभाग, जि. प., जळगाव
हा बंधारा चुकीच्या ठिकाणी काही लोकांच्या सांगण्यावरून मंजूर नसलेल्या ठिकाणी बांधला. त्यामुळे नुकसान झाले. सिंचन विभागानेच तो तोडला. सिंचन विभागाच्या चुकीच्या मार्गदर्शनाने बंधाऱ्याची अवस्था झाली. शासनाचा खर्च वाया गेला. नदीत पाणी अडविले गेले नाही. अद्याप कारवाई नाही.
-विजय कडू पाटील, माजी सरपंच, चिंचपुरे, ता. पाचोरा
या बंधाऱ्याचे काम गावापासून २०० मीटर अंतरावर होते. मात्र, मंजूर ठिकाणी न बांधता वळणावर सिंचन विभागाच्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली बांधला. पुराच्या पाण्याने घरांचे नुकसान झाले. अद्याप कारवाई नाही. बंधारा बांधकामाची चौकशी व्हावी. दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
-रघुनाथ हिराजी पाटील, माजी सरपंच, चिंचपुरे, ता. पाचोरा