जळगाव : जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलेल्या प्रदीप दशरथ शिरसाठ (वय ५२, रा. संताजीनगर, चोपडा) या शिक्षकाच्या खिशातील ४० हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता नवीन बसस्थानकात घडली.
देशमुख हे चोपडा येथून एसटी बसने जळगाव बसस्थानकात साडेतीन वाजता आले. बसमधून खाली उतरण्यापूर्वी त्यांनी खिशातील ४० हजार रुपये तपासले असता रक्कम होती. ५०० रुपयांच्या ८० नोटांचे हे बंडल होते. बसमधून उतरल्यानंतर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही रक्कम काढून घेतली. गर्दीतील लोकांकडे चौकशी केली, तसेच आजूबाजूला शोध घेतला. मात्र, रक्कम मिळून आली नाही. जिल्हा परिषदेत कामासाठी ही रक्कम आणली होती. पैसे चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर देशमुख यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.