शेतकऱ्यांच्या जखमा भरण्यासाठी २७ लाखांचे मलम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 16:41 IST2023-09-13T16:40:35+5:302023-09-13T16:41:32+5:30
२३६ पैकी ११० जनावरांच्या मृत्यूपोटी राज्य शासनाकडून २७ लाख १८ हजारांच्या भरपाईची रक्कम पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाली आहे.

शेतकऱ्यांच्या जखमा भरण्यासाठी २७ लाखांचे मलम!
कुंदन पाटील
जळगाव : ‘लम्पी’मुळे जिल्ह्यातील २३६ पशुधनांचा बळी गेला. एकीकडे दुष्काळाचे ढग डोक्यावर आहेत. तर दुसरीकडे ‘लम्पी’ने दाराशी असलेले पशुधन हिरावून नेले. दुहेरी संकटांच्या काटेरी कुंपणात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी पोळ्याची पूर्वसंध्या लाभदायी ठरली आहे. २३६ पैकी ११० जनावरांच्या मृत्यूपोटी राज्य शासनाकडून २७ लाख १८ हजारांच्या भरपाईची रक्कम पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे बळीराजाचा ‘बैल-पोळा’ यंदाही आनंद उधळेल, हे निश्चीत.
जिल्ह्यात दि.१३ सप्टेंबरपर्यंत २३६ जनावरांचा बळी गेला आहे.चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व पारोळा तालुक्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. विशेष म्हणजे, या चारही तालुक्यांवर दुष्काळाचे ढग आहेत. तिथले पाणीप्रकल्पही कोरडेठाक आहेत. तशातच लम्पीने पशुधन हिरावून नेले. त्यामुळे यंदाचा पोळा अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली होती. तशातच चार दिवस पाऊस झाला. थोडासा दिलासा मिळाला.
‘पशुसंवर्धन’ सरसावले!
पशुसंवर्धन विभागाने पशुधनाची बळी गेल्यानंतर तातडीने पंचनामे हाती घेतले. संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी गेल्या आठवड्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. सादर केलेल्या सर्वच प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिली आणि २७ लाख १घ हजार रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला. त्यामुळे पोळाच्या पूर्वसंध्येला भरपाई रक्कम प्राप्त झाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना तालुका प्रशासनाने कळविली. त्यानंतर काळजांसाठी काळीज दुखावलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली.
अशी मिळणार भरपाई
पशुधन-भरपाईची रक्कम
वासरु-१६ हजार
बैल-२५ हजार
गाय-३० हजार
मृत जनावरांची तालुकानिहाय संख्या
जळगाव-०२
पाचोरा-३०
अमळनेर-०६
यावल-००
एरंडोल-२०
भुसावळ-००
चाळीसगाव-१२९
जामनेर-०१
भडगाव-२३
चोपडा-०४
रावेर-००
धरणगाव-०६
पारोळा-१५
मुक्ताईनगर-००
बोदवड-००
एकूण-२३६
कोट
शेतकऱ्यांचे दु:ख पुसण्यासाठी सर्वच यंत्रणांनी पंचनाम्यांना प्राधान्य दिले. अहवालही वेळेत सादर केले. त्यामुळे प्रस्ताव तातडीने सादर करता आले. त्यामुळे पोळापूर्वीच भरपाईची रक्कम मिळाल्याने नक्कीच समाधान आहे.अन्य पशुधन मालकांनाही लवकरच भरपाईची रक्कम मिळेल, त्यादृष्टीने कामकाज सुरु आहे.
-शामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग