आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहतूक खोळंबली : रस्त्यावर कोणीच नसल्याने सुदैवाने मोठी जीवित हानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील स्वातंत्र्यवीर चौक परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुमारे वीस वर्ष जुने डेरेदार गुलमोहरचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. सुदैवाने मुख्य रस्त्यालगत सिग्नल लागला असल्याने रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित हानी टळली असली तरी या झाडाखाली दोन चार चाकी वाहने दाबली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जात असलेल्या एका महाविद्यालयाचा विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरातील गुलमोहरचे झाड रस्त्यावर अचानक कोसळले. या झाडासोबतच वसतिगृहातील कम्पाउंडची भिंत व सोबतच विद्युत खांबासोबतच विद्युत वाहिन्यादेखील रस्त्यावर कोसळल्या. डेरेदार वृक्ष रस्त्यालगत कोसळल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक यामुळे खोळंबली होती. सुदैवाने या ठिकाणी एकही वाहन नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीजवळ लावण्यात आलेल्या एम एच १९ एपी ४५१९ व एम एच १५ जिए ६१८८ या क्रमांकाच्या २ कारवर झाड कोसळल्यामुळे या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दोन्ही वाहने एस बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. सुदैवाने झाड कोसळले त्यावेळेस या कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
सिग्नल असल्याने रस्त्यावर नव्हते वाहन
स्वातंत्र्य चौकात जेव्हा हे झाड कोसळले त्याच वेळेस एका बाजूला सिग्नल सुरू असल्याने सर्व वाहने त्याच बाजूला उभी होती. त्यामुळे या रस्त्यालगत एकही वाहन नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र झाड कोसळल्यावर विद्युत वाहिनीदेखील रस्त्यावर कोसळल्यामुळे काही नागरिकांनी वेळीच सावध होऊन या रस्त्याकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवून ठेवली. तसेच महावितरणला याबाबत माहिती देऊन या भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले होते, तसेच या झाडामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली होती.