गुढीपाडव्याच्या सणादिवशीच घात झाला; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:37 IST2025-03-31T16:09:37+5:302025-03-31T16:37:45+5:30
मेंढपाळ नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन शेतशिवारातील जंगलात चारण्यासाठी गेले होते.

गुढीपाडव्याच्या सणादिवशीच घात झाला; मेंढपाळावर कोसळला दु:खाचा डोंगर
सारंगखेडा : एकामागोमाग १६ मेंढ्या पाण्यात पडताना पाहून आणि त्यांना वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्याने ऐन गुढीपाड्याला मेंढपाळांवर दुखाचा डोंगर कोसळला. शहादा तालुक्यातील कवठळ येथील घटनेने ठेलारी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शहादा तालुक्यातील कवठळ तर्फे सारंगखेडा येथे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी ही घटना घडली.
कवठळ शिवारात नंदुरबार तालुक्यातील आसाने येथील जवळपास अडीचशे मेंढ्यांचा कळप घेऊन हरी भटा ठेलारी हे आले आहेत. त्यांच्यासह कवठळ येथील मेंढपाळ तुंबा सागू भिल हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन शेतशिवारातील जंगलात चारण्यासाठी गेले होते. मेंढ्यांना पाणी पाजण्यास घेऊन जात असताना मेंढ्या अचानक दचकल्या. नदीपात्रात सारंगखेडा बॅरेजेसमुळे पाण्याचा मोठा साठा आहे. नदीकाठावर खड्डादेखील आहे. पाणी पित असताना एक मेंढी पडली. मागोमाग एक एक करून १६ मेंढ्या पाण्यात पडल्या. यावेळी मेंढपाळांनी आरडाओरड केल्याने नदीपात्रातील मासेमारी करणारे व गावकऱ्यांना उर्वरित मेंढ्या वाचवण्यात यश आले.
सरपंच अनिल पाटील, पोलिस पाटील नितीन पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. हरी भटा ठेलारी यांच्या १३ व तुंबा सागू भील यांच्या तीन मेंढ्या पाण्यात बुडाल्याने १६ मेंढ्यांच्या मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सरपंच अनिल पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाला माहिती दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्ती संजीत धामणकर यांनी भेट देत पाहणी केली.