कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंत १०० ते १२५ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:41+5:302021-09-13T04:15:41+5:30

जळगाव : एकीकडे शहरातील महत्त्वाच्या मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली असताना, दुसरीकडे कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंतच्या ...

100 to 125 pits from Court Chowk to Ganesh Colony | कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंत १०० ते १२५ खड्डे

कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंत १०० ते १२५ खड्डे

जळगाव : एकीकडे शहरातील महत्त्वाच्या मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली असताना, दुसरीकडे कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचींही प्रचंड दुरवस्था झाली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंतच्या या रस्त्यावर लहान-मोठे १०० ते १२५ खड्डे आढळून आले आहेत. या खड्ड्यातून वाहन काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडीदेखील उद्भवत आहे. तसेच या रस्त्यावरच्या साईड पट्ट्यांचींही दुरवस्था झाली असल्याचे दिसून आले.

कोर्टासमोर जागोजागी खड्डे

कोर्ट चौकापासून गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुरुवात होत आहे. या रस्त्याच्या सुरुवातीलाच चौकामध्येच ठिकठिकाणी भले मोठे पाच ते सहा खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यातून दगड-गोटे वर आल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या चौकातील एका ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची डाब तुंबली आहे. यामुळे कामानिमित्त कोर्टात येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शाहू महाराज रुग्णालयापर्यंत ४० ते ५० खड्डे

कोर्ट चौकापासून पुढे शाहू महाराज रुग्णालयाकडे जातांना रस्त्यावर दर २० ते २५ फुटांच्या अंतरावर लहान-मोठे खड्डे पडलेेले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही मधोमध खड्डे आहे. कोर्ट चौक ते छत्रपती शाहू महाराज रुग्णालयापर्यंत ४० ते ५० खड्डे पडलेले दिसून आले. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यांचींही प्रचंड दुरवस्था झालेली दिसून आली. यामुळे वाहन घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो

रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर

कोर्ट चौक ते गणेश कॉलनीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने १०० ते १२५ लहान-मोठे खड्डे आहे. ऐन गणेशोत्सवातही मनपातर्फे या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यात या रस्त्यावर अनेक ठिकाणी सकाळ-सायंकाळ विविध विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. या रस्त्यावर गणेश कॉलनीच्या चौकातच ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसल्यामुळे, या चौकातच वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: 100 to 125 pits from Court Chowk to Ganesh Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.