वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 13:56 IST2019-05-10T13:52:29+5:302019-05-10T13:56:46+5:30
नदी पात्रातील भूयारामधून वाळूचा उपसा करत असताना ढिगारा कोसळला

वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने युवकाचा मृत्यू
भोकरदन (जालना) : वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथे आज सकाळी (दि.१० ) १० वाजेच्या सुमारास घडली. ऋषिकेश कैलास पाचरणे असे मृत युवकाचे नाव आहे. अवैध वाळू उपसा करताना मागील काही दिवसातील तालुक्यातील हा चौथा बळी ठरला आहे.
या बाबतची माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान चोऱ्हाळा येथील ऋषिकेश पाचरणे हा ट्रक्टर चालक संदिप धोंडीराम पाचरणे व इतर तीन जणांसोबत लिंगेवाडी शिवारातील केळना नदी पात्रातील वाळूचा अवैधरित्या उपसा करण्यासाठी गेला. नदी पात्रातील भूयारामधून वाळूचा उपसा करत असताना ऋषिकेशच्या अंगावर अचानक वाळूचा ढिगारा कोसळला. यात दबल्या गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
तालुक्यातील चौथा बळी
तालुक्यात यापूर्वी अवैध वाळूचा उपसा करताना गोकुळ येथे दोन तर कोदोली परिसरात एक जणांचा मृत्यू झाला होता. ऋषिकेश हा चौथा बळी ठरला आहे.