Your defeat came to our notice - Uddhav Thackeray | तुमचा पराभव आमच्या जिव्हारी लागला- उद्धव ठाकरे
तुमचा पराभव आमच्या जिव्हारी लागला- उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या ३० वर्षांपासून आपण निष्ठावान शिवसैनिक म्हणून कार्य केले आहे. दोन वेळेस मंत्री, आमदार राहून केवळ जालन्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात तुम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. अनुभवी नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, तुमच्या पराभवाची बातमी आमच्या जिव्हारी लागली, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केल्याची माहिती माजी आ. अर्जुन खोतकर यांनी दिली.
अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पराभवाची कारणमिमांसा सांगताना अद्याप आपण नेमके कशामुळे हारलो, हे स्पष्ट सांगता येणार नाही. परंतु, त्याचा मागोवा आपण घेत असून, साधारणपणे महिनाभरानंतर पराभवाची कारणे समोर येतील, ती कोणती आहेत? याची माहिती मी आपणापर्यंत निश्चितपर्यंत देईन, असे खोतकरांनी ठाकरे यांना सांगितले. या भेटीत मराठवाड्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठाकरे यांनी माहिती जाणून घेतल्याचे खोतकर म्हणाले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, पंडित भुतेकर, अनुराग कपूर, किशोर बलांडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Your defeat came to our notice - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.