Work of wells will be done in the fields of 19 farmers | ६१९ शेतकऱ्यांच्या शेतात होणार विहिरींची कामे
६१९ शेतकऱ्यांच्या शेतात होणार विहिरींची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. लॉटरी पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत ६१९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, सभापती कळंबे, सभापती बनसोडे, कृषी अधिकारी भिमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्ष खोतकर व उपाध्यक्ष टोपे यांच्या हस्ते कॉईन काढून सोडतीला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी जिल्हाभरातील ४ हजार ६८७ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार २५९ जणांचे प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाले. यातून २४४० अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, १८१९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र अर्जांची सोमवारी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असून, यात ५८३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यातील १०२, बदनापूर ९९, भोकरदन ३६, घनसावंगी ३२, जाफराबाद २४, जालना १८९, परतूर ५३ व मंठा तालुक्यातील ४८ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी २०२ शेतक-यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १०० अर्ज पात्र ठरविण्यात आले. १०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी ३६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात अंबड तालुक्यातील ५, बदनापूर १, भोकरदन ९, घनसावंगी ३, जाफराबाद ९, जालना २, मंठा ४, परतूर तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अनिरुध्द खोतकर : कार्यालयात तक्रार बॉक्स तयार करा
कृषी अधिका-यांनी तातडीने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची बिल देयके द्यावीत. बिलासाठीच लाभार्थ्यांना चकरा- मारू देऊ नका. यासाठी कृषी अधिका-यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांनाही या सूचना द्याव्यात. शेतक-यांच्या तक्रारीसाठी कृषी कार्यालयात तक्रार बॉक्स ठेवावा. आलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या आहे.

Web Title: Work of wells will be done in the fields of 19 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.