जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 19:07 IST2023-11-24T19:02:01+5:302023-11-24T19:07:29+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही; आमदार पडळकर यांचा आरोप

जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप
जालना : धनगर समाजाच्या मोर्चावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जो प्रकार घडला तो घडवण्यामागे कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जाहीर केले. तसेच जालन्यातील जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांमागे अदृश्य हात कोणाचे आहेत? असा आरोपही आमदार पडळकर यांनी केला.
जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. येथे काही आंदोलक आमरण उपोषण करत आहेत. त्यांची भेट आज गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,२१ नोव्हेंबर रोजी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कल्पना असूनही निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी आला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यातून काही कुंड्या फुटल्या, एका गाडीची काच फुटली. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांशी आमचे बोलणे झाले, त्यातून आम्ही त्यांना दहा आंदोलकांची नावे दिली.
मात्र, त्यानंतर पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. हे कसे झाले? एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही. या अधिकाऱ्यांच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण गृहमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले. याबाबत एक पत्र देखील आपण गृहमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३६ जणांवरील गुन्हे रद्द करावेत, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशी मागणी देखील त्यांनी केली.