आईला पाहण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

By दिपक ढोले  | Updated: June 7, 2023 15:38 IST2023-06-07T15:38:07+5:302023-06-07T15:38:34+5:30

सोने-चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

Went to see mother and here thieves cleaned the house | आईला पाहण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

आईला पाहण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

जालना : आईची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी घरातील सोने - चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना शहरातील बालाजीनगर येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बालाजीनगर येथील रहिवासी अहमद खान नवाब खान पठाण हे ४ जून रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या आईची तब्बेत खराब झाल्याने परिवारासह संभाजीनगर येथे गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. मंगळवारी सायंकाळी अहमद खान नवाब खान पठाण हे जालना येथे आले. त्यांना घरात चोरी झाल्याचे कळाले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चोरट्यांनी सोने - चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलिस करीत आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली.

Web Title: Went to see mother and here thieves cleaned the house