शाब्बास! ट्रकचालकाच्या मुलीची उत्तुंग भरारी;परिस्थितीवर मात करत बनली जलसंधारण अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:40 IST2022-04-28T17:36:04+5:302022-04-28T17:40:11+5:30
सततच्या नापिकीमुळे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. त्यामुळे वडिलांनी ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम केले.

शाब्बास! ट्रकचालकाच्या मुलीची उत्तुंग भरारी;परिस्थितीवर मात करत बनली जलसंधारण अधिकारी
- गणेश लोंढे
राणी उंचेगाव ( जालना) : हलाखीच्या परिस्थितीत कठोर परिश्रम घेऊन जालना तालुक्यातील हिस्वन खुर्द येथील ट्रकचालकाची मुलगी उपविभागीय जलसंधारण अधिकारी झाली आहे. प्रियंका कपूरचंद राजपूत असे त्या मुलीचे नाव आहे.
हिस्वन खुर्द येथील कपूरचंद राजपूत व प्याराबाई राजपूत यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सततच्या नापिकीमुळे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. त्यामुळे कपूरचंद राजपूत यांनी ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम केले. त्यांना आपल्या मुलीला उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनवायचे होते. त्यानुसार प्रियंंकाला खूप अभ्यास करण्यास सांगितले. परंतु, ते काही दिवसांनी सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथे स्थायिक झाले. तेथेच प्रियंकाने पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले.
पुढील शिक्षण तिने मूळगाव असलेल्या हिस्वन येथील कनिष्ठ महाविद्यालयात घेतले. त्याचवेळी तिला मोठे अधिकारी होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. नंतर औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळविली. २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करून दोन वेळा परीक्षा दिली. त्यामध्ये तिला दोन वेळा अपयश आले. परंतु, अपयशाने खचून न जाता तिने अभ्यास सुरूच ठेवला. अधिकारी बनण्याचे स्वप्न तिला बसू देत नव्हते. २०१९ मध्ये तिने एमपीएससीमार्फत स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा दिली. त्याचा निकाल १३ एप्रिल रोजी लागला. यात प्रियंका उत्तीर्ण झाली असून तिची उपविभागीय जलसंधारण अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रयत्न केल्यास यश मिळते
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न केले पाहिजेत. सतत प्रयत्न केल्याने यश मिळते. माझ्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती होती. परंतु, तरीही मी अभ्यास करून यशस्वी झाले. सर्वांनी कठोर मेहनत करून आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. यासाठी मला माझ्या कुटुंबाने साथ दिली.
- प्रियंका राजपूत