वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:57+5:302021-09-04T04:35:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टेंभुर्णी : टेंभुर्णीसह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य वीज कार्यालयास वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ...

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : टेंभुर्णीसह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य वीज कार्यालयास वेळेवर उपलब्ध होण्यासाठी आपण सहकार्य करणार आहोत. यासाठी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई न करता प्रत्येक कामाची वेळीच दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांनी केले. टेंभुर्णी व परिसरातील वीजपुरवठ्याबाबत गुरुवारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभियंता व वीज कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेतली, याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हस्के म्हणाले, टेंभुर्णीसह परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळावी म्हणून आ. संतोष दानवे यांच्या माध्यमातून जागोजागी अधिक क्षमतेचे रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आ. दानवे यांच्या माध्यमातून काही सहकार्य लागत असेल, तर तेही पुरविले जाईल. मात्र ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सुरळीत वीज द्यावी. यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. या वेळी सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी टेंभुर्णी येथील लाइनमन घेत असलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले.
या बैठकीला टेंभुर्णी विद्युत कंपनीचे कनिष्ठ अभियंता नितीन चिंचाने, सरपंच सुमन म्हस्के, ग्राम विकास अधिकारी सुखदेव शेळके, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, गणेश धनवई, विष्णू जमधडे, माजी उपसरपंच फैसल चाऊस, राजू खोत, गौतम म्हस्के, भिकनखा पठाण, शिवाजी मुळे, राम गुरव, उद्धव दुनगहू, विद्युत कर्मचारी शेख हमीद, सुभाष कळंगे, रामू कुमकर आदींसह विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.