"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 18:24 IST2025-09-14T18:22:51+5:302025-09-14T18:24:15+5:30
"तुमच्या आई-बहीणीला आम्ही कधी बोललो का? तुमची लेक आमची लेक समजली. पण आता त्याची पायली भरली आहे."

"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
वडीगोद्री(जि. जालना)- मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्ही जर आई-बहीणीपर्यंत जाणार असाल, तर आता पुढे आम्हीदेखील तुमच्यासारख्या गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो. सध्या मराठा आणि ओबीसीत भांडण लावायचे काम सुरू आहे. आता काय व्हायचे असेल ते होऊ द्या," असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
मराठ्यांनी कधी कुणाच्या लेकराबाळावर घाला घातला नाही
अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, "दहा तारखेला नागपुरामध्ये ओबीसी मोर्चा निघणार आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, एक शोकांकिता वाटते. आम्ही लढून मिळवले, त्यांना तर लढावे पण लागले नाही. येवल्याचा आली बाबा छगन भुजबळ लै बोलतोय. मागील वीस पंचवीस वर्षाची हिस्ट्री काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमध्ये सुद्धा घेतल्या."
बंजारा समाजाला नोंदी असल्यास आरक्षण द्या
अजित पवार यांच्या 'कोणावरही अन्याय होणार नाही' या वक्तव्यावर जरांगे म्हणाले, "अन्याय आधीच झालाय. कार्यकर्ते पाळले, तेच मोठा अन्याय आहे. परळीची लाभार्थी टोळी प्रत्येक जातीचा वापर करते. त्यांना(धनंजय मुंडे) बोलता येईना म्हणून, दुसऱ्यांच्या तोंडातून भाषा ओढून घेतात. यांची टोळी जातीजातींत भांडण लावते." बंजारा समाजाने एसटीमधील आरक्षणाची मागणी केल्याबाबत म्हणाले, "ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यावे. आम्ही जातीवादी नाही. कुणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही होऊ देत नाही. विरोध फक्त लाभार्थी टोळी करते."
लक्ष्मण हाकेंना थेट इशारा
हाके यांच्या वक्तव्याचा उल्लेख करताना जरांगे म्हणाले, "तुमच्या आई-बहीणीला आम्ही कधी बोललो का? तुमची लेक आमची लेक समजली. पण आता त्याची पायली भरली आहे. लेकीबाळांवर बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" यावेळी त्यांनी धनगर समाजाला उद्देशूनही सांगितले की, "लाभार्थी टोळी तुमच्यात शिरली. गरीब धनगर व मराठ्यांचे नाते तोडले. आता जशास तसे होईल. तुम्ही जर आमच्या आरक्षणात आडवे येत असाल, तर तुम्हाला कोण कोणत्या योजना लागू आहेत, आम्हाला चांगले माहित आहे. त्या तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही, आम्ही देखील योजना चॅलेंज करू," असा इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिला.
गडकरींच्या वक्तव्याला उत्तर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'आरक्षण हा राजकीय वादाचा विषय झाला' असे म्हटल्यावर जरांगे म्हणाले, "गडकरी साहेब, तुम्ही खरं बोललात. पण आरक्षणावर बोलून आमच्या लेकराबाळांच्या अस्मितेवर घाला घालू नका. तुमच्यासारखा विकास करणारा महाराष्ट्राला हवा होता. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, उच्च विचाराच्या माणसाकडून आम्हाला ही अपेक्षा नाही. आमच्या मनात तुमची प्रतिमा आहे, ती निघून जाऊ नये, ही आमची इच्छा आहे. तुम्ही आमचे म्हणणे समजून घ्यावे, हे आम्हाला वाटते."